गुरुवार, ६ डिसेंबर, २०१२

माणसातील माणुसकी ...


माणसातील माणुसकी

सदानंद वालेकर माझा थोडा वेगळ्याच प्रकारात मोडणारा मित्र. त्याचे दुकान म्हणजे अनेक उपक्रमांचे केंद्र. अनेक चांगली माणसे तिथे येतात व मस्त गप्पा रंगतात यात सदानंदवर मानवलोक व बाबूजींचे संस्कार. त्यामुळे गप्पाच्या माध्यमातून
 काहीतरी सामाजिक छोटी मोठी कृती तिथे येणाऱ्या प्रत्येकाकडून होते.
एक दिवस सदानंदनी मला दुकानातून हाक दिली, “दादा,मोकळे असला तर या की.”

मी पण थोडा निवांत होतो. काही वेळ वालेकर साहेबांशी गप्पा माराव्यात म्हणून बसलो.

“दादा एक खूप महत्वाचे काम आहे करता येईल का ते पहा...” वालेकर आपल्या
नेहमीच्या अदाकारित बोलत होता.

“दादा,एक मुलगी आहे, तिच्या वडिलांचा अपघात झाला आहे. शिक्षणासाठी तिला मदत करता येईल का ?”

“कोण आहे ही मुलगी ?”

“अकरावी सायन्सला आहे. लाडेवडगावची स्वाती साहेबराव लाड.”

आम्ही स्वातीला वस्तीगृहात भेटायला गेलो. पाहिल्या बरोबर आठवी नववीत असावी इतकी छोटी. चांगलीच ठेंगणी.खुपच बुजरी. स्वातीचे वडील साहेबराव एम.ए (इंग्लिश)च्या पहिल्या वर्षापर्यंत शिकलेले. त्यानतंर त्यांनी मानवलोकचे काम केले प्रथम फिल्ड वर्क व नंतर किल्लारी भूकंपात. काही वर्षांपासून ते आपल्या गावाकडेच एक छोटास दुकानं व सोबतच गावातील मुलांना अभ्यास व अभ्यास पूरक अशा अनेक गोष्टी शिकवत. दोन एक्कर कोरडवाहू जमीन आहे आपल्या पत्नी बरोबर थोडं तिथे पण पोटापुरते होई. एक दिवस शिकण्यासाठी आलेल्या मुलांना आंबे काढून देण्यासाठी म्हणून ते झाडावर चढले. मुलं चांगलीच खुश व त्या खुशीत साहेबराव पण खुश !!

अचानक काय झाले ते कळले नाही. साहेबरावांचा पाय निसटला व ते झाडाहून खाली पडले.खाली कोरडी विहीर होती पण साहेबरावांचे दैव बलवत्तर ते कोरड्या विहिरीत न पडता फांदीला अडकून बाजूच्या दगडांवर पडले. उचांहून पडल्यामुळे प्रचंड लागले.डॉक्टर म्हणाले जवळपास गेल्यातच जमा. पण साहेबरावाची इच्छा शक्ती मुळे ते यातून बचावले. पूर्ण शरीर अपंग झाले. बरेच दवाखाने केले पण काहीच उपयोग नाही. कुटुंबाचा आधारच एका जागेवर अडवा पडून राहिल्यावर काय होणार तेच साहेबरावांच्या कुटुंबाचे झाले.

खूप मोठं संकट होत पण साहेबराव व वहिनींनी त्याच्याशी लढायच ठरवलं. मुलांना त्यांना शिकून मोठ करायचं होत. मुलाला आटीआयसाठी बीडला व मुलीला ११ विज्ञानासाठी खोलेश्वर महाविद्यालयात त्यांनी पाठवले. साहेबरावांची सेवा शुश्रूषा करून वाहिनी शेती व शेत मजुरी करू लागल्या. पण एकट्या माऊलीच्या कष्टाने हे सावरणारे नव्हते.

“काय स्वाती, तुला मोठ होऊन काय व्हायचं आहे ?” मी विचारले.

“डॉक्टर”

“खूप अभ्यास करावा लागतो.”

खाली मान घालूनच तिने मान डोकावली.
मी थोडं घरच्यांबद्दल विचारले.
स्वातीच्या डोळ्यातून झरझर अश्रू. आपले स्वप्न व परिस्थितीचे चटके यामुळे वास्तवाचा अनुभव त्या लहानग्या जीवाला आला असेल. मी थोडा विषय बदलला व वस्तीगृहाच्या प्रभारी सरांशी बोलू लागलो.

“सर, हिच्या फीस चे कसे ?”

“निवासाची फीस त्यांनी भरली आहे आता केवळ मासिक मेसचा खर्च आहे महिन्याला अकराशे रुपये.”

ज्ञान प्रबोधिनीच्या डोंबिवली विस्तार केंद्राच्या प्रमुख सौ श्रुतीताई फाटकांच्या मुलाच्या (सौरभ )लग्नाला मी गेलो होतो. लग्न प्रबोधिनीच्या पद्धतीने झाले. त्यात नवरा नवरीने संकल्प करायचा असतो. त्यांनी संकल्प केला होता,

“एखाद्या गरजू विद्यार्थाचा शिक्षणासाठीचा खर्च करेल.”

मी लगेच सौरभला फोन लावला व त्याला स्वाती व साहेबराव यांच्या बद्दल
सांगितले. त्यांनी लगेच लागेल ती मदत स्वातीला देण्याचे मान्य केले.

“चांगला अभ्यास कर,काही चिंता करू नकोस.” असे म्हणत आम्ही निरोप घेतला.

विवेकवाडीहून एक दिवस भाशिप्रच्या बैठकीसाठी अंबाजोगाईला आलो तर कार्यालया समोर स्वाती व एक प्रौढ महिला होती. स्वातीने तिला सांगितले हे
प्रसाददादा.... तो पर्यंत माझे स्वातीच्या घरातील कुणाशीच बोलणे खाले नव्हते. आईने हसून अभिवादन केले व फोन नंबर मागितला.

दिवाळीच्या काळात एक फोन आला, आवाज चांगलाच दमदार व भाषा शुद्ध होती, “नमस्कार, मी लाड बोलतो आहे. दिवाळीला फराळाला या. वालेकरानापण सांगितले आहे.”

हो, येतो असे आश्वासन दिले पण विवेकवाडीतील काम व दुसऱ्या पायाला झालेला अपघात या मुळे काही लाडेगावला जाता आले नाही.
परवाच्या दिवशी विवेकवाडीत फोन आला, “नमस्कार, मी लाड बोलतो आहे. आपण कुठे आहात?”

“विवेकवाडीत.”

“कुठे आहे ती नेमकी ?”

मी सविस्तर पत्ता सांगितला. ठीक आहे म्हणत साहेबरावांनी फोन ठेवला.
दुपारचे जेवण झाले होते. चुलीवरच्या स्वयंपाकाची चवच न्यारी. मस्त जेवण करून मोबाईलहून फेसबुक जोडले जाते का याचा आटापिटा करत होतो. भर दुपारी एक ऑटोरिक्षा शिवरस्त्याहून विवेकवाडीच्या रस्त्याने आत आला. तो सरळ इमारती समोर. मी खुल्या सभागृहात बसलो होतो.
रिक्षातील व्यक्तींनी नमस्कार केला. मी त्यांना मध्ये येण्यास सांगितले.
“नाही उतरता येणार....” उत्तर आले.

अरे हे तर साहेबराव दिसतात मी अंदाज केला. हळूच उठत रिक्षेत जाऊन बसलो. थोड्या गप्पा झाल्यावर त्यांनी रिक्षाचालवणाऱ्या मुलाची ओळख करून दिली,

“हा संतोष माझा मुलगा.”

“हा आयटीआयला आहे न ?”

“आता नाही, परिस्थिती मुळे परतावे लागले. सध्या रिक्षा चालवतो”
“एवढ्या दुर कशाला आलात भाऊ, मी व सदानंद भेटायला येणारच होतोत.”

“नाही, म्हटलं आपण स्वतःच एकदा भेटून धन्यवाद म्हणावेत आपण करत असलेल्या मदती बद्दल,” ज्यांना औषधउपचार करताना रिक्षाच्या टफावर झोपून आणावे लागत होत ते आज रिक्षात बसून आले होते पण शरीराची हालचाल आजिबात होत नव्हती. माझ्या बायकोनी त्यांना

जेवणाचा आग्रह केला व त्यांच्यासाठी ताटे लावली. साहेबरावाना संतोष अगदी लहान मुलांसारखे भरवत होता.

“काय करणार आपले हे असे झाले....जिवंत राहिल पण लेकरांचे भविष्य मात्र बिघडले.” साहेबराव गहिवरून बोलले.

“नक्की चांगले होईल चिंता करू नका. काय रे संतोष माझ्या बरोबर काम करशील का ?” मी म्हणालो.
संतोषनी मान डोलावली.

आता निघाले पाहिजे. बराच वेळ झाला. साहेबराव निरोप घेऊन निघणार
येवढ्यात माझ्या बायकोने त्यांना येणाऱ्यांची नोद वही दिली, मी संतोषला म्हणालो, “बाबा जे सांगतात ते लिही.”